नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती गेल्या सात वर्षांच्या उच्चांकावर गेल्याने मंगळवारी देशातील विमान इंधनाच्या किंमती 3.3 टक्क्यांनी वाढल्या. त्यांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती सतत वाढत असल्याने विमान इंधन किंवा एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किंमतीत यंदा पाचव्यांदा वाढ झाली आहे.
तर दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 116 व्या दिवशी स्थिर राहिले. राष्ट्रीय राजधानीत, सरकारी मालकीच्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या किंमत सूचनेनुसार ATF ची किंमत 3,010.87 रुपये प्रति किलो किंवा 3.22 टक्क्यांनी वाढून 93,530.66 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे.
एअरलाईनचा वाढता परिचालन खर्च
भारतीय विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात ATF किंवा जेट इंधनाचा वाटा 45 ते 55 टक्के आहे. भारतातील ATF ची किंमत जगात सर्वाधिक आहे. आता पुन्हा एकदा त्यात वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा हवाई प्रवास महाग होऊ शकतो. ATF ला GST च्या कक्षेत आणण्याची इंडस्ट्री अनेक दिवसांपासून मागणी करत आहे.
कच्च्या तेलाची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा 100 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $ 102.14 आणि WTI ने $ 96.15 प्रति बॅरल पार केली आहे. वाढत्या किंमतीचा सर्वांगीण परिणाम दिसून येत आहे.
पेट्रोल डिझेलचे काय होईल ?
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होतो. मात्र, कच्च्या तेलाच्या जागतिक किंमतीत चढ-उतार झाल्यानंतरही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. गेल्या वर्षी दिवाळीपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी झेप घेतली असली तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
नोव्हेंबर 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स कमी करून जनतेला दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी नोव्हेंबरपासून म्हणजेच दिवाळीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पाच राज्यांतील निवडणुका संपण्याची शेवटची तारीख 7 मार्च आहे, तर निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होतील. अशा परिस्थितीत 10 मार्चनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.