काबूल । इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानात तालिबानचा ताबा घेतल्यानंतर माजलेल्या अराजकतेच्या दरम्यान काबूल विमानतळावर स्फोट घडवून अनेकांचे बळी घेतले. यानंतर अमेरिकेने त्यांच्या ठिकाणाला लक्ष्य केले. आता रविवारी अमेरिकेने इसिसच्या आत्मघातकी दहशतवाद्यावर ड्रोनने हल्ला केला आहे. परदेशी वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसनुसार, अमेरिकेचे म्हणणे आहे की, इसिसचा हा आत्मघाती दहशतवादी कारने काबूल विमानतळावर हल्ला करण्याचा विचार करत होता. या हल्ल्यात तीन मुलांचाही मृत्यू झाल्याचे अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
या अमेरिकन ड्रोन हल्ल्यात एक कार उडवण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे, ज्यामध्ये अनेक आत्मघातकी हल्लेखोर असल्याची चर्चा आहे. हे हल्लेखोर काबूल विमानतळावर हल्ला करणार होते असेही सांगितले जात आहे. इसिसवर अमेरिकेने केलेला हा दुसरा हवाई हल्ला आहे. गुरुवारी ISIS ने काबूल विमानतळावर हल्ला करून 13 अमेरिकन सैनिक आणि काही अफगाण नागरिकांना ठार केले.
इस्लामिक स्टेटशी संबंधित ISIS-K ने केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर तालिबानने हवाई क्षेत्राभोवती सुरक्षा वाढवली आहे. त्या आत्मघाती हल्ल्यात 180 हून अधिक लोकं मारली गेली. ब्रिटनने शनिवारी आपली सर्व उड्डाणे पूर्ण केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अमेरिकेच्या सर्वात प्रदीर्घ युद्धातून सर्व सैन्य मागे घेण्याच्या मंगळवारच्या मुदतीपूर्वी अमेरिकन लष्करी मालवाहू विमाने रविवारी विमानतळावरून उड्डाण करत राहिली.
लष्कराचे प्रवक्ते यूएस नेव्ही कॅप्टन बिल अर्बन म्हणतात की,” हा ड्रोन हल्ला स्वसंरक्षणासाठी होता. मात्र, या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला की नाही याचा लष्कर अजूनही तपास करत आहे. पण याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.”
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी यापूर्वी पत्रकारांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की,” या हल्ल्यात एका हल्लेखोराला लक्ष्य करण्यात आले, जो स्फोटकांनी भरलेले वाहन चालवत होता.” मुजाहिद यांनी आणखी काही माहिती दिली. अमेरिकेच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर हवाई हल्ला यशस्वी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की,” या हवाई हल्ल्यानंतर, इतर स्फोट झाले, जे वाहनात पुरेशा प्रमाणात स्फोटक साहित्याची उपस्थिती दर्शवते.”