हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऐन गणेशोत्सव काळातच गडचिरोली जिल्ह्यातील पातानाल येथील तीन हत्तींना गुजरातला हलवण्यात आले आहे. जामनगर मधील अंबानी यांच्या कंपनीकडे देखभाल करण्यासाठी या हत्तींना नेण्यात आले. हिंदू धर्मात गणराजाला देव मानतात, त्यातच गणेशोत्सव काळातच अशा प्रकारे हत्तींना गुजरातला पाठवण्यात आल्याने या भागातील नागरिकांसह पर्यावरण प्रेमींनीही संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून येथील हत्ती गुजरातला हलविण्यावरून वाद सुरू होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून हत्ती स्थलांतराचा प्रश्न सुरू होता. त्यावेळी सर्व राजकीय पक्षीय नेते, जिल्ह्यातील आमदार, खासदार व सामाजिक संघटनांनी याला तीव्र विरोध केला होता. हत्तीचे स्थलांतरन होऊ नये म्हणुन लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांचा होणारा तीव्र विरोध आणि जनभावनेचा आदर करीत त्यावेळेस हत्ती स्थलांतरनचा निर्णय रद्द केला होता. मात्र आता राज्यातील सत्ता बदलली आहे. शिंदे – फडणवीस सरकार असताना आणि विदर्भाचेच सुनील मुनगंटीवार वनमंत्री असल्याने जिल्ह्य़ातील प्राणी प्रेमी व या परिसरातील जनता आता आपल्या हत्तीचे स्थलांतरन होणार नाही म्हणून निश्चिंत होती पण आज भल्या पहाटेलाच कुणाचेही ध्यानी मनी नसतांना पातानिल येथील तीन हत्तीना गुजरातला हलवण्यात आले आहे. यामध्ये दोन हत्ती हे सत्तर वर्षाच्या वरील आहेत तर एक हत्ती चौविस वर्षाचा युवा आहे.
आलापल्ली वनविभागातील पातानील येथील तीन हत्ती देण्याबाबतचा आदेश शासनस्तरावरून व वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्याने आपण प्रक्रिया पुर्ण करुन हत्ती दिलेत. यात एक मादी हत्ती तर दोन नर हत्ती होते अशी प्रतिक्रिया उपवनसंरक्षक वन विभाग राहुल टोलीया यांनी दिली आहे.
दरम्यान, हत्तींना अशा प्रकारे गुजरातला हलवण्यात आल्याने गडचिरोली मिम्सनेही नाराजी व्यक्त केली आहे. गडचिरोली जिल्हा आधीही उपेक्षित होता आणि आताही उपेक्षितच आहे. आधी काँग्रेस सरकार होतं आता भाजप आहे, सरकार बदलली परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाही. यामुळे इथल्या निसर्गाचे आणि नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अशा शब्दांत गडचिरोली मिम्सने ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना संताप व्यक्त केला. एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री असताना त्यांनी इथल्या हत्तींना कुठेही जाऊ देणार नाही, त्यांना चांगल्या सुविधा देऊ अस आश्वासन दिलं होतं, पण नंतर कोणीच ते पाळत नाही. यापूर्वी देखील आम्ही अनेक आंदोलन केली मात्र याचा कोणताच फायदा झाला नाही असेही गडचिरोली मिम्सने म्हंटल.