कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील दक्षिण भागातील उंडाळे विभागात असलेले अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेत, कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत वीजबिलापोटी ३ लाख रूपयांचा चेक आज पेठ नाका (ता. वाळवा) येथील वाकुर्डे योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
कराड तालुक्यातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांनी वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. पण या योजनेचे वीजबिल थकीत असल्याने या भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल कृष्णा कारखान्यामार्फत अदा करावेत, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार थकीत विजबिलाचा ३ लाखांचा चेक सुपूर्द करण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची ग्वाही दिली. त्यामुळे या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागल्याने विविध गावातील स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, नांदगावचे सरपंच हंबीरराव पाटील, सवादेचे माजी सरपंच संजय शेवाळे, पंकज पाटील, मनवचे उपसरपंच दादासो शेवाळे, दत्तात्रय साळुंखे, अशोक पाटील, वैभव जाधव, विकास पाटील, तानाजी पाटील, सादिक महारुगडे, शिवाजी चिबडे, प्रमोद पाटील, गणेश पाटील, श्रीकांत पाटील, काशिनाथ पाटील, अभिजित कळंत्रे, विजय पाटील, आबासो शेंडगे, शहाजी पाटील यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.