औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील उस्मानपुरा भागातील २० वर्षीय तरुणाने व बजाजनगर येथील वाहनचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर फुलंब्री येथील एका रुग्णालयामागे एका 65 वर्षीय अज्ञात वृद्ध महिलेने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
रोहित गौतम रुपटक्के(वय 20 वर्षे, रा. मिलिंदनगर,उस्मानपुरा), परमेश्वर रघुनाथ मरकंटे (वय 39 वर्षे, मूळ गाव भोकसखेडा, ता. देगलूर, जि. नांदेड, ह.मु. बजाजनगर, वाळूज) अशी मृतांची नावे आहेत, तर वृद्ध महिलेची ओळख पटलेली नाही.
मृत परमेश्वर मरकंटे व त्यांची पत्नी सुंदराबाई यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला होता. या वादानंतर पत्नी सुंदराबाई या रात्री 10.30 वाजता घरातून निघून परिसरातील मंदिरात जाऊन बसल्या. मात्र, 7 वर्षीय पूनम आणि 6 वर्षीय ज्योती या दोन मुली घरी झोपलेल्या असल्याने दोघी झोपेतून उठल्यावर रडतील, या भीतीने त्या पुन्हा अर्ध्या तासातच घरी परत गेल्या. तेव्हा मरकंटे यांनी दोरीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. सुंदराबाई यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परमेश्वर मरकंटे यांना फासावरून खाली उतरवत रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती, अशी माहिती तपास अधिकारी हवालदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.
भावी नवरदेवाची आत्महत्या
उस्मानपुरा भागातील मिलिंदनगरमध्ये राहणारा रोहित रुपटक्के हा एका खाजगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तो मामाच्या घरी आई-बहिणीसोबत राहत होता. त्याचे नात्यातल्याच एका मुलीसोबत लग्न ठरले होते. पुढील वर्षात त्याचे लग्न होणार होते. रोहितची आई मुंबई येथे गेली असता त्याने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने छताला गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब आज सकाळी उघड होताच पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून त्यास फासावरून खाली उतरवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात हलविला. रोहितने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अज्ञात वृद्धेची हत्या की आत्महत्या?
अंदाजे 65 ते 70 वर्षे वयाच्या एका वृद्ध महिलेचा फुलंब्री येथील गाडेकर रुग्णालयाच्या पाठीमागील जागेत दोरीच्या साहाय्याने अॅगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही हत्या की आत्महत्या, याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मृत वृद्धेची ओळख अद्याप पटू शकली नाही.