सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
तुरुंगात शिक्षा भोगत असणारा आरोपी अंकुश लालासाहेब चव्हाण (वय- 30, रा. ठाकुरकी ता. फलटण) हा गावी संचित रजेवर आले असताना. शेजारील यशवंत जाधव यांना हनुमंत बोडरे यास बोलावून आण असे सांगितले, त्यास नकार दिल्याने यशवंत जाधव यांचे दारूच्या नशेत अंकुश चव्हाण याने घर पेटवून दिले होते. सदरच्या खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा एस. जी. नंदीमठ यांच्या कोर्टात आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फलटण तालुक्यातील ठाकूरकि येथे यशवंत बाबु जाधव (वय- 73) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात 27 जुलै 2020 रोजी फिर्याद दिली होती. या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, अंकुश चव्हाण याने यशवंत जाधव यांना हनुमंत बोडरे यास बोलावून आणण्याकरिता सांगितले होते. त्यास यशवंत जाधव यांनी नकार दिल्याने अंकुश चव्हाण याने त्यांचे घर पेटवून दिले होते. यामध्ये संसारोपयोगी साहित्य जळून 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांनी आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते.
या गुन्ह्यात 6 साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस एस पाटील यांनी या केस मध्ये परिश्रम घेतले. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजीराव घोरपडे, सहाय्यक महिला फौजदार ऊर्मिला घाडगे, पोलीस हवलदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी केसमध्ये मदत केली.
आरोपीस भा. द. वि. स. क 436 प्रमाणे 3 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड व कलम 427 प्रमाणे 1 वर्ष सक्तमजुरी व 2 हजार रूपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद सुनावण्यात आली आहे. तसेच दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.