सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील द्राक्ष बागायतदार शेतकर्यांना पुणे व दिल्लीच्या व्यापार्याने 30 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. द्राक्षे उधारीवर खरेदी करून पैसे न देताच पळून जाणार्या व्यापारी व कामगारांना शेतकर्यांनी फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडले. चिंचणी येथील शेतकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील सात ते आठ शेतकर्यांची द्राक्षे विशाल रामचंद्र पाटील, आतिष धिंग्रा, मनीषकुमार, हरीश वर्मा व मनोज या पुणे व दिल्ली येथील द्राक्ष व्यापार्यांनी एका दिवसाच्या उधारीवर खरेदी केली.
हे व्यापारी तासगाव येथील एका लॉज वर राहण्यास होते. द्राक्षे खरेदी केल्यानंतर आत्ता देतो मग देतो अशी त्यांची उत्तरे सुरू झाली. बुधवारी सकाळी 11 च्या दरम्यान या व्यापाऱयांचा शेतकर्यांना संशय आला. यानंतर त्यांनी लॉज मालकास दिलेली आधारकार्ड चेक केली असता ही बोगस आधारकार्ड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. माहिती मिळताच शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप माने, लखन पाटील,दिलीप पाटील, संजीव लुगडे यांच्यासह शेतकर्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली.
पोलिसांना पैसे देण्यासाठी लॉजवर जातो. असे सांगून टाटा सुमोतून पळून जाताना तीन व्यापारी व्यापार्यांना शेतकर्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.तर लॉजवरून पळण्याच्या तयारीत असणार्या एकालाही शेतकर्यांनी पकडले. मात्र या सारयांचा सूत्रधार व आणखी एक व्यापारी पुण्याला पळून निघाले असल्याची माहिती शेतकर्यांना मिळाली. यानुसार सातारा जिल्ह्यातील पुणे बेंगलोर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर एकास पकडले तर एक पळून गेला.