चीनकडून तालिबान सरकारला 31 मिलियन डॉलर्सची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाल्यानंतर 24 तासांच्या आत चीनने आपली तिजोरी उघडली आहे. चीनने बुधवारी तालिबानला सरकार चालवण्यासाठी $ 3.1 कोटी (31 मिलियन) ची मदत जाहीर केली. यासोबतच चीन अफगाणिस्तानला कोरोना लसीचे डोस पाठवत आहे. अराजकता संपवण्यासाठी आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी ही मदत आवश्यक असल्याचे चीनने म्हटले आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर शेजारील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले कि, “चीन अन्नधान्य, हिवाळ्यातील वस्तू, कोरोना लस आणि गरजेच्या औषधांसाठी 200 मिलियन यूआन (31 मिलियन अमेरिकी डॉलर) अफगाणिस्तानला देईल.

पाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला इराण, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. मात्र, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत रशियाने सहभाग घेतला नाही. वांग यी म्हणाले,”पहिल्या खेपेत चीनने अफगाणिस्तानला 30 लाख लस दान करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.”

चीनने आधीच आवाहन केले होते की,” जगाने तालिबानसोबत एकत्र काम केले पाहिजे, या भागात आर्थिक मदत चालू ठेवणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानला दिलेली ही मदत फक्त एक सुरुवात आहे. तालिबानने आता अफगाणिस्तानमधील परिस्थिती सामान्य करावी असे चीनचे म्हणणे आहे.”

तालिबाननेही गेल्या आठवड्यात जाहीर केले की,” चीन आर्थिक महासत्ता आहे, त्यामुळे तो त्याला मोठा भागीदार मानतो.” तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी एका इटालियन वृत्तपत्राला सांगितले की,” त्यांचा गट मुख्यत्वे चीनकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहे. अलीकडच्या काळात, अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी अफगाणिस्तानला आर्थिक मदत प्रतिबंधित केली आहे. त्यानंतर तालिबान सरकार चालवण्यासाठी आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत चीनने मदतीचा हात पुढे केला आहे.”

दरम्यान, तालिबानच्या माध्यमातून चीन बगराम एअरबेसवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याच्याही बातम्या येत आहेत. अफगाण युद्धाच्या वेळी अमेरिकेने जवळपास 20 वर्षे या एअरबेसचा वापर केला.