व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भेसळयुक्त ऑईल, डांबर वाहतूक प्रकरणात 35 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

फलटण शहर पोलीस स्टेशनकडील ट्राॅफीकचे कर्मचाऱ्यांना फलटण येथील बारामती पुल येथे नाकाबंदी करीत असताना बेकायदेशीर भेसळयुक्त ऑईलचे 34 बॅरल मिळून आले तर डांबराचे 52 बॅरल आणि एक माल ट्रक असा एकुण 35 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ट्रक चालकांसह चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार लोणंद बाजुकडुन एक अशोक लेलंड कंपनीचा ट्रक क्रमांक (एम.एच- 25. यु- 8292) हा बॅरलमध्ये भेसळयुक्त डांबर व भेसळयुक्त ऑईलची वाहतुक करीत असताना संशयास्पद मिळुन आला. ट्रकवरील ड्रायव्हर लहु बब्रुवान माने (रा. चंडकाळ ता. उमरगा जि. उस्मानाबाद) याचेकडे चौकशी केली असता. त्याने सदरचा माल हा सचिन कुन्हाडे व इतर अनोळखी दोन यांचे सांगणेवरुन शिरवळ येथील राजस्थानी ढाब्याचे पाठीमागे भरलेला असुन हैद्राबाद येथे घेऊन निघालो आहे असे सांगितले. त्यावेळी मालाचे इन्व्हाईस (पावती) पाहता सदरचा माल दिल्ली येथुन भरुन हैद्राबाद येथे खाली करण्यास निघाला असलेचे नमुद असल्याने बिलाबाबत संशय आल्याने पोलिसांनी ड्रायव्हरकडे विचारपुस केली. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सदरबाबत संशयास्पद वाटत असल्याने सदरचा ट्रक हा सीआरपीसी 102 प्रमाणे फलटण शहर पोलीस स्टेशन आवारात आणून लावण्यात आला.

त्यानंतर तहसीलदार फलटण यांना पुरवठा निरीक्षक मिळणेबाबत पत्रव्यवहार करून पुरवठा निरीक्षक म्हणुन मनोजकुमार जयसिंग काकडे हे हजर राहील्यानंतर दोन शासकीय पंच यांचे उपस्थितीत क्रेनच्या सहाय्याने ट्रकमधील बॅरल खाली उतरविण्यात आले. त्यांची तपासणी केली असता एकुण 52 बॅरल हे भेसळयुक्त डांबराचे मिळुन आले. ज्याबाबत ड्रायव्हर लहू माने यांचेकडे कोणतेही बिल नव्हते. तसेच एकुण 34 बॅरल हे बेकायदेशीर भेसळयुक्त ऑईलचे बॅरल मिळून आलेने त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. डांबराचे 52 बॅरल, बेकायदेशिर भेसळयुक्त आईलचे 34 बॅरल व माल ट्रक क्रमांक (एम.एच. 25 यु- 8292) असा एकुण 35, 50,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई शुक्रवारी दि. 13 मे रोजी सायंकाळी 5.45 वाजणेचे सुमारास मौजे फलटण येथील बारामती पुल या ठिकाणी करण्यात आली. यामध्ये आरोपी लहू बब्रुवान माने, सचिन कुन्हाडे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) व इतर 2 अनोळखी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे हे करीत आहेत.

तसेच पुरवठा निरीक्षक मनोजकुमार जयसिंग काकडे यांचे सांगणेप्रमाणे जिवनावश्यक वस्तु कायद्यामध्ये डांबर येत नसल्याने जप्त करण्यात आलेले 52 भेसळयुक्त डांबराचे बॅरलबाबत स्वतंत्र कारवाई करणे योग्य होणार असल्याने त्याबाबत उचित कारवाई करणेची तजवीज ठेवण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मागदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे, पोहवा सुरेश शिंदे, पोहवा महादेव पिसे, पोना शरद तांबे, पोना नितीन भोसले, पोक. अतुल बडे, पोकॉ. पांडुरंग धायगुडे, पोकॉ. गणेश ठोंबरे, पोकॉ. सहदेव साबळे यांनी सदरची कारवाई केली आहे.