हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: संपूर्ण देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या आहे. यात मुंबई, पुणे सारखी शहरे आघाडीवर आहेत. आता मुंबईतील भायखळा जेल मध्ये देखील कोरोनाने थैमान घातले असून या तुरुंगात एकाच दिवसात 38 महिला कैदी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
38 inmates at Byculla jail, including accused in Sheena Bora murder case Indrani Mukerjea, have tested positive for #COVID19: Byculla jail authority, Mumbai#Maharashtra
— ANI (@ANI) April 21, 2021
मागील वर्षीही कोरोनाचा कहर होताच मात्र एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर तुरुंगातील कैदी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत त्यामुळे सोशल डिस्टंसिंग इतर नियमांचा पालन होताना दिसत नाही. त्यामुळे तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. याआधी कोल्हापूर कारागृहात दहा दिवसांपूर्वी एकाच वेळी 28 जण कोरोना बाधित रुग्ण आढळले होते.
माराष्ट्रातील कोरोना रुग्ण स्थिती
राज्यात आजपर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ३९ लाख ६० हजार ३५९ इतका झाला आहे. त्यासोबतच एकूण मृतांचा आकडा देखील ६१ हजार ३४३ इतका झाला आहे.राज्यात एकीकडे पुन्हा कठोर लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना दुसरीकडे करोना रुग्णांची आणि करोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येत आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ५१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यासोबतच, राज्यात दिवसभरात एकूण ६२ हजार ९७ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
राज्यात आज दिवसभरात एकूण ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट वाढणं अपेक्षित आहे. मात्र, दुसरीकडे नवे करोनाबाधित सातत्याने वाढत असल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सातत्याने खाली येऊ लागल्याचं गेल्या महिन्याभरात दिसून आलं आहे. सध्या राज्यात एकूण ६ लाख ८३ हजार ८५६ ऍक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.