औरंगाबाद प्रतिनिधी | चार दिवसाच्या नवजात बाळाला घाटी रुग्णालयाच्या ग्रंथालयाजवळ ठेवून माता पसार झाल्याची घटना बुधवारी दुपारी समोर आली. बाळाला मुंग्या लागल्याने त्याच्या रडण्याचा आवाजाने सुरक्षा रक्षकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.
घाटी रुग्णालयाच्या ग्रंथालया जवळील झुडुपातून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षक तेथे गेले. तेव्हा झुडुपाच्या सावलीखाली तीन ते चार दिवसाचे बाळ बेवारस अवस्थेत टाकल्याचे दिसले. बाळाच्या अंगाला मुंग्या चावू लागल्याने ते बाळ रडत होते.
या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना कळवून बाळाला घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये दाखल करण्यात आले आहे.बाळाची प्रकृती चांगली असून त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.