धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी 4 तरुणांनी विषारी औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे मराठा तरुणांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. त्यातूनच बुधवारी बार्शी तालुक्यात चार तरुणांनी विषारी औषध पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. रणजित ऋषीनाथ मांजरे, योगेश भारत मांजरे, दीपक सूर्यकांत पाटील आणि प्रशांत मोहन मांजरे असे या चार तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर कर्मवीर मामासाहेब जगदाळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार विरोधात आवाज उठवत देगाव येथील ग्रामस्थांनी कॅण्डल मार्च आणि रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामध्ये रणजित ऋषीनाथ मांजरे, योगेश भारत मांजरे, दीपक सूर्यकांत पाटील आणि प्रशांत मोहन मांजरे हे चौघे तरुण देखील सहभागी झाले होते. परंतु सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे आंदोलन संपताच या तरुणांनी गावाच्या वेशीवर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी चौघांना देखील कर्मवीर मामासाहेब जगदाळे रुग्णालयात दाखल केले. सध्या या चौघांवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु यातील रणजित मांजरे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, मराठा आंदोलनामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सरकार मराठ्यांचा आवाज ऐकत नसल्यामुळे मराठा तरुण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मराठा तरुणांनी आरक्षणाची मागणी करत आपले आयुष्य संपवले आहे. मंगळवारी देखील पंढरपूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या बाजूला, सोलापूर जिल्ह्यात मराठा तरुणांनी स्मशानभूमीमध्येच जिवंत चिता समाधी आंदोलन सुरू केले आहे. या सर्वांची एकच मागणी आहे की, राज्य सरकारने तत्काळ मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे.