नवी दिल्ली । कोरोनामुळं देशातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येसोबत मृत्यूचा आकडा सुद्धा चिंतेत भर घालत आहे. गेल्या २४ तासात देशात ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. याचसोबत आतापर्यंत एकूण २३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ७ हजार ४४७ वर पोहोचली आहे. तसेच देशात लॉकडाऊन लागू केला नसता तर देशात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ८ लाखाच्या घरात गेली असती अशी धक्कादायक माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
तर राज्यात सुद्धा कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्यानंतर नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा आता १ हजार ६६६ वर पोहोचला आहे. आज कोरोनाचे आणखी ९२ रुग्ण आढाळले आहेत. तर कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ११० जणांना प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एकूण ३१ हजार ८४१ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. कोरोनाचे केंद्रबिंदू बनलेल्या मुंबई-पुणे शहरात कोरोनाच्या चाचणींचे प्रमाण वाढले असून कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम ठेवला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”