कराड | जुळेवाडी येथील युवक राजवर्धन महादेव पाटील (वय- 24) याचा पुजारी चौकात मागील आठ दिवसापूर्वी मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दोन संशय़ीतांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी पाच संशयितांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. अक्षय सर्जेराव पाटील (वय 22), निशांत निवास पाटील (20), ऋषिकेश हणमंत काशिद (22), बिरदेव भिमराव कोळी (27), यशपाल शंकर काशिद (37, सर्व रा. जुळेवाडी) अशी संशयीतांची नावे असुन त्यांनी या प्रकरणी मदत करुन आसरा दिल्यामुळे त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती कराड तालुका पोलिसांनी दिली.
पोलिसांची माहिती अशी ः जुळेवाडी येथील एका युवकाचा वाढदिवस 26 नोव्हेंबरला होता. त्याचा केक कापण्यासाठी रात्री गावातील पुजारी चौकात युवक जमले होते. तेथे राजवर्धन महादेव पाटील (वय 24, रा. जुळेवाडी) हाही होता. राजवर्धनच्या घरापासून काही अंतरावरच हा चौक आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना गावातीलच विजय काशिद या युवकाने अचानक राजवर्धन याच्यावर धारदार कोयत्याने दहा ते पंधरा वार केल्याने राजवर्धनचा मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी विजय काशिद याला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास केल्यानंतर राजवर्धनच्या खुनात आणखी संशयित असल्याचे तपासात समोर आले.
जुळेवाडीतुन अजय बाबासो काशिद-पाटील (वय 20, रा. जुळेवाडी) याला अटक केली होती. या खुन प्रकरणामध्ये आणखी काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरुन तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तपास केला. त्यामध्ये संबंधित संशयीतांना आसरा देणे, मदत करणे यासाठी अक्षय सर्जेराव पाटील, निशांत निवास पाटील, ऋषिकेश हणमंत काशिद, बिरदेव भिमराव कोळी, यशपाल शंकर काशिद या संशयीतांनी मदत केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे संबंधित संशयीतांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगीतले.