“पवार साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही”; सुप्रिया सुळेंची Facebook पोस्ट करत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु असून कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात न येण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांचे दौरे रद्द केले आहेत. यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीचे नेत्यांकडून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी शरद पवार आणि एस. एम. जोशी यांनी ऐंशीच्या दशकातील दिलेल्या लढ्याची आठवण सांगितली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीकाही केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटल आहे की, कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली. साहेबांनी कर्नाटक पोलीसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता.

सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला. खुद्द एस एम जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरविलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.

https://www.facebook.com/supriyasule/posts/701650534648050

पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होते.बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही.साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता.

बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला.आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.

साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय, असा प्रसंग सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितला आहे.