हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२२ ला अवघे २ दिवस बाकी असून क्रिकेट प्रेमींची उत्सुकता वाढली आहे. त्यातच यंदाच्या आयपीएल मध्ये १० संघ खेळणार असून यामुळे स्पर्धेची रंगत निश्चितच वाढणार आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएल ला पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष्य मुंबई इंडियन्स कडे असेल.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने आत्तापर्यन्त सर्वाधिक ५ वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माचे कल्पक नेतृत्त्व आणि त्याला संघातील इतर धुरंदर खेळाडूंनी दिलेली साथ यामुळे मुंबईचा आयपीएल मध्ये नेहमीच दबदबा राहिला आहे. परंतु यंदाच्या आयपीएल लिलावात मात्र बरीच उलथापालथ झाली असून मुंबईला हार्दिक पंड्या, क्विंटन डी कॉक, ट्रेंट बोल्ट, कृणाल पंड्या यांसारखे आपले अनेक महत्त्वाचे खेळाडू गमवावे लागेल.
मुंबई इंडियन्स ने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड या ४ खेळाडूंना संघात कायम राखले. तर आक्रमक सलामीवीर ईशान किशनला तब्बल १५ कोटी रुपयांत खरेदी करून पुन्हा एकदा आपल्या ताफ्यात घेतले. यंदाचे आयपीएल सामने मुंबई आणि पुण्यात होणार घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मुंबईच्या संघाला नक्की होईल त्यामुळे चॅम्पियन मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा आयपीएल जिंकणार का याकडे चाहत्यांचे लक्ष आहे