अंगणवाडीत शिकणाऱ्या 5 वर्षांच्या बालकाचा विहीरीत बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : गोंदी (ता. कराड) येथील अंगणवाडीत शिकत असलेल्या बालकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. राजवर्धन विक्रम पवार (वय- 5 वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. रेठरे बुद्रुक येथे दोन दिवसापूर्वी पहिलीत शिकणारा मुलगा नदीत बुडून मृत्यू झाला होता. आता याच भागात अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकाचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांची व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : राजवर्धन हा रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घरातून एकटाच कराड- वाळवा हद्दीच्या सीमेवर असलेल्या विहिरीकडे गेला होता. त्याने स्वतः कपडे काढून ठेवले व पायऱ्यांवरून तो विहिरीत गेला. त्याने पाण्यात उडी घेतली; परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. दुपारी बाराच्या सुमारास विहीर मालक हे विहिरीजवळ गेले असता, त्यांना विहिरीच्या काठावर कपडे पडलेली व विहिरीमध्ये पाण्यावरती राजवर्धन तरंगत असलेला दिसून आला.

ही घटना विहीर मालकांनी त्यांच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर गावठाणातील लोकांनी तिकडे धाव घेतली. राजवर्धन याला ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले व त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी राजवर्धन याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.