हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १२ किलोमीटर असलेल्या यवली गावातून ५० मजूर विलगीकरण कक्षातून पळून गेले आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून घरची आतुरता असल्याने या मजुरांनी नियम धाब्यावर बसवत दवाखान्यातून पळ काढला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढते आहे. मुंबई पुण्यासारखे जिल्हे रेड झोन मध्ये आहेतच पण महाराष्ट्रातील इतर भागातही दिवसेंदिवस नव्याने रुग्ण समोर नयेत आहेत. ऑरेंज झोनमधील जिल्हे रेड झोनमध्ये परावर्तित होताना दिसत आहेत. ग्रीन झोनमध्ये हळूहळू रुग्ण आढळू लागले आहेत.
महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा सुरुवातीपासून ग्रीन झोन मध्ये होता. मात्र मागच्या आठवड्यात गडचिरोलीतील कुरघेडा तालुक्यात २ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल सकारात्मक आल्याचे आढळून आले. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत तातडीने जिल्ह्यातील मजुरांना जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी दूर असलेल्या यवली गावात विलगीकरण कक्षात ठेवले होते. एकूण १२० रुग्ण याठिकाणी अलगावमध्ये होते. १६ मे पासून विलगीकरणात असलेल्या या मजुरांपैकी ५० मजूर आज या केंद्रातून पळाले आहेत.
राज्य सरकार कोरोनावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. अशावेळी मजुरांनी पळून जाण्याने खळबळजनक स्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या विविध भागात आता हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन विलगीकरण केंद्रे तयार करत असून संसर्ग थांबविण्याचा प्रयत्न करते आहे. मजुरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणे गरजेचे असल्याचे दिसून येते आहे. इतर कामगारांसारखे आपल्यालाही खूप सहन करावे लागेल ही भीती त्यांच्या मनातून काढणे आवश्यक आहे. असे केल्यास कदाचित अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.