अहमदाबाद | गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळी आहे . या घटनेतील आरोपी हा मूळचा बिहारचा आहे. रविंद्र साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुजरात येथील नागरिकांना ही माहिती मिळताच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. यूपी- बिहार येथील नागरिकांची हाकालपट्टी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी हल्लाबोल सुरु केला. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरुद्ध उसळलेल्या हिंसेनंतर गेल्या आठवड्याभरात ५०,००० नागरिकांनी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारावरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान हे सर्व कामगार सणांसाठी घरी गेल्याचा दावा गुजरात प्रशासनाने केला आहे.
सोशल मीडियावर उत्तर भारतातून येणाऱ्या कामगारांविरुद्ध संदेश व्हायरल झाले. अनेक ठिकाणी कारखान्यांमध्ये, गावांमध्ये उत्तर भारतीय कामगारांना मारहाण करण्यात आली. काही जणांना घरातून बाहेर काढण्यात आले. या साऱ्यामुळे धास्तावलेल्या उत्तर भारतीय कामगारांनी गावी पलायन करण्यास सुरुवात केली. राज्यात हिंसा पसरविण्याचा दृष्टीने काँग्रेसने ठाकोर समाजाला हाताशी धरून जाणून बुजून हा हिंसाचार घडवून आणल्याचे आरोप भाजपने केले आहेत. अशाच प्रकारचा आरोप जेडीयूनेही केला आहे. ‘ एकीकडे काँग्रेस बिहारमध्ये ठाकोर समाजात प्रचार करण्यासाठी अल्पेश ठाकोरला महत्त्वाचं पद देते तर दुसरीकडे तोच ठाकोर समाज गुजरातमध्ये बिहारी कामगारांची हकालपट्टी करण्याचे काम करीत आहेत, याचा काय अर्थ समजावा’ असा प्रश्न जेडीयूने उपस्थित केला आहे .