सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जावली तालुक्यातील सातारा बाल विकास प्रकल्प आणि स्वर्गीय रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तब्बल 50 विधवा अंगणवाडी सेविका, मदतनीस महिलांना मंगळसूत्र, हळदी कुंकाचा करंडा, साडी-चोळी, चुडा देऊन सन्मानित करण्यात आले.
जावली येथे आयोजित उपक्रमास परिसरातील संख्येने उपस्थिती लावत चांगला प्रतिसाद दिला. समाजात विधवांना मान मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभागाने हा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. स्त्री अखंड सौभाग्यवती आहे. पतीच्या निधनानंतर स्त्रीचे सौभाग्य हिरावून तिची विटंबना करू नये. पतीच्या पश्चात तिच्यातील आई जिवंत ठेवून तिला कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे या स्त्रीचा समाजात सन्मान व्हावा. या उद्धेशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या विधवा महिला सन्मानाने भारावून गेल्या. त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम सर्व ठिकाणी राबविण्यात यावेत. जेणेकरून इतर ठिकाणच्या महिलांना देखील सन्मान मिळेल, अशी अशा व्यक्त केली.