ख्रिश्चन धर्माचा त्याग करून 53 जणांनी हिंदूधर्म स्वीकारला

hindu
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या 12 कुटुंबातील 53 महिला व पुरुषांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. हा धर्मांतर सोहळा पैठण येथील शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात झाला. धर्मांतर केलेले जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामधील रहिवासी आहेत. यावेळी वेदशास्त्रसंपन्न पंडितांनी हिंदू धर्म शास्त्र व धर्मविधी केले. धर्म प्रवेश सोहळ्याबाबत पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश कमलाकर शिवपुरी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

यावेळी नाथांचे 14 वे वंशज रावसाहेब महाराज गोसावी, कीर्तनकार प्रफुल्लबुवा तळेगावकर महाराज, नाथवंशज तथा नाथ पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी, कमलाकर गुरू शिवपुरी, योगेश महाराज पालखीवाले, शालिवाहन नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर चौहान, माजी उपनगराध्यक्ष रेखा कुलकर्णी, समीर शुक्ल, श्याम पंजवाणी, धर्म जागरण विभागाचे प्रमुख संजय वालतुरे, श्याम यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. धर्मांतर केलेल्यांचा यावेळी शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे चौहान यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

मंठा तालुक्यातील आणखी 22 ख्रिश्चन कुटुंबातील 65 व्यक्ती हिंदू धर्मात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली. हा धर्म सोहळा पैठण येथे 5 जानेवारीला होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.