सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून इच्छूक असणाऱ्यांचे अर्ज मागविले जात असून आज अखेर सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूक असणाऱ्या सहा जणांनी अर्ज नेले आहेत. जयश्रीताई पाटील, सुभाष खोत, आनंद डावरे आदींचा समावेश आहे.
विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागविण्याचे आदेश जिल्हा कॉंग्रेसला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आ.मोहनराव कदम यांनी जिल्ह्यातील सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, जत, इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडून इच्छूक असणाऱ्यांचे अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. जिल्हा पातळीवर अर्ज दाखल करण्याची मुदत पाच जुलै तर प्रदेश पातळीवर अर्ज दाखल करण्याची मुदत सहा जुलै आहे.
खुल्या प्रवर्गासाठी पंधरा हजार तर मागसवर्गीय विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांसाठी दहा हजार रूपये शुल्क आहे. आज अखेर सहा इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. त्यमाध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या नेत्या, अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सदस्या जयश्रीताई पाटील, सुभाष खोत मिरज विधानसभा मतदारसंघासाठी आनंद डावरे, नामदेव कस्तुरे, विनोद कांबळे यांचा समावेश आहे.