सभासदांना दरवर्षी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देणार : जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कृष्णा कारखान्याच्या इतिहासात सभासदांना दरवर्षी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने, आता सभासदांना ही ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याची महत्वपूर्ण घोषणा वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील जाहीर सभेत केली आहे. मोफत साखर घरपोच देण्याच्या या घोषणेमुळे सभासदांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले असून, सहकार पॅनेलच्या या घोषणेचे सर्वस्तरातून मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.

कराड तालुक्यातील कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ रेठरे हरणाक्ष येथे अभूतपूर्व प्रतिसादात सहकार पॅनेलची सभा बुधवारी पार पडली. या सभेच्या व्यासपीठावर माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक व उमेदवार संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की आम्ही २०१५ साली जेव्हा सत्तेवर आलो तेव्हा कारखान्याची स्थिती फारच बिकट होती. पण सगळ्या संकटातून मार्ग काढत आज आम्ही कारखाना सुस्थितीत आणला आहे. याउलट विरोधकांनी गैरव्यवहारां व्यतिरिक्त दुसरे काहीही केले नाही. खोट्या सह्या करून त्यांनी उचललेले ५८ कोटींचे कर्ज आता व्याजासह १०० कोटींचे झाले असून, त्याला संपूर्णत: त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहे. तर दुसरे एक विरोधक ज्या पतसंस्थेचे मार्गदर्शक आहेत, त्या पतसंस्थेतून लोकांच्या ठेवी मिळेनाशा झाल्या आहेत. अशा बेजबाबदार लोकांच्या हातात आपण सत्ता देणार आहोत का? असा सवाल करत, कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनेललाच साथ द्या, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

संस्थापक पॅनेलच्या कारभारावर टीका करताना ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते म्हणाले, की, अविनाश मोहिते हे अपघाताने तयार झालेले नेतृत्व आहे. कारखाना चालवायला या माणसाने एक पत्रकार ‘बाबा’ नेमला. तो पत्रकार एवढा हुशार की त्याने मनोमिलनच होऊ दिले नाही. खरंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा या निवडणुकीशी काहीही संबंध नसताना ते यात का उतरले होते, हे समजायला कारण नाही. संस्थापक पॅनेलचे नेते जेव्हा मते मागायला येतील, तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जेलमध्ये का गेला होता? हा कारखाना सक्षमपणे चालविण्याची धमक फक्त डॉ. सुरेश भोसले यांच्यामध्येच असून, कारखान्याला वैभव मिळवून देण्यासाठी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करा. यावेळी डॉ. अतुल भोसले यांचेही भाषण झाले. या सभेत संस्थापक व रयत पॅनेलच्या अनेक दिग्गजांनी सहकार पॅनेलमध्ये प्रवेश करत आपला पाठिंबा व्यक्त केला.

Leave a Comment