संतापजनक ! नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला अटक

रामनाथपुरम : वृत्तसंस्था – रामनाथपुरम या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नापास करण्याची धमकी देऊन क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. एका विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आले. या आरोपी शिक्षकाने नापास करण्याची धमकी देऊन अनेक मुलींना आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हि घटना तामिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यातील मुदुकुलाथूर येथील सरकारी अनुदानित शाळेमधील आहे. आरोपी शिक्षक हा विज्ञान विषयाचा शिक्षक असून कोचिंग देण्याच्या बहाण्याने तो विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत होता. हा शिक्षक कोचिन क्लासेस घेत असताना विद्यार्थिनीकडून मोबाईल नंबर घ्यायचा. त्यानंतर कोणताही बहाणा करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे. तसेच फोन करून अश्लील आणि लज्जास्पद गप्पासुद्धा मारायचा. या दरम्यान आरोपीने एका मुलीला खास कोचिंग क्लासेसाठी घरी येण्यास सांगितले तसेच घरी न आल्यास नापास करेल, अशी धमकीदेखील दिली.

या दरम्यान संबंधित आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीला कॉल केल्यानंतरची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये आरोपीने याअगोदर देखील बऱ्याच विद्यार्थिनींना आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची कबुली दिली आहे. तसेच या आरोपी शिक्षकाने इतर अनेक विद्यार्थिनींची नावे घेऊन चुकीच्या टिप्पण्या देखील केल्या आहेत. याप्रकरणी मुधुकुलाथूर पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक करून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचारासह बलात्कार आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

You might also like