फलटण | शारदानगर, कोळकी (ता. फलटण) येथील निवृत्त शिक्षिकेच्या घरातून अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे गज वाकवून प्रवेश करत घरातील कपाटील 14 लाख 36 हजार 189 रूपये किंमतीचे 61 तोळे 6 ग्रॅम 659 मिलिग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिण्यांवर डल्ला मारला आहे. दि. 2 सप्टेंबर पासून मार्डी, (ता. माण) येथे काही कामानिमित्त घर बंद करून निवृत्त शिक्षिका व व त्यांची बहीण दोघीही गेल्या असताना दि. 10 व 11 सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली आहे. या बाबतची माहिती शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी सदर महिलांना कळविल्यानंतर त्यांनी फलटण येथे येऊन घरातील परिस्थिती पहिल्यांनंतर शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यावरून फलटण शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करून गुन्हयाच्या तपासाला गती दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीमती कस्तुरा सीताराम माळी (वय- 63, रा. शारदानगर, कोळकी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्या स्वतः व त्यांच्या भगिनी शकुंतला सीताराम माळी या शारदानगर, कोळकी येथे राहत असून काही कामानिमित्त परगावी गेलेल्या होत्या. या काळात अज्ञाताने घरात प्रवेश करून श्रीमती कस्तुरा माळी यांचे 11 लाख 86 हजार 189 रूपये किमतीचे आणि शकुंतला सीताराम माळी यांचे 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे असे एकूण 14 लाख 36 हजार 189 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
या दागिन्यांमध्ये कानातील टॉप्स जोड, अंगठ्या, कानातील चैन, सोन्याचे बदाम, कानातील झुबे, खडा टॉप्स, कोईम्बतूर झुबे, टॉप्स, पाटल्या, चार बांगड्या, हातातील चार गोठ, अंगठी, गंठण, मणी हार, पेंडल, नेकलेस, मोहन माळ, चेन, लक्ष्मी हार, वैगरे 11 लाख 86 हजार 189 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि शकुंतला सीताराम माळी यांचे गळ्यातील मिनिगंठन, लक्ष्मी हार, दोन बांगड्या, गळ्यातील चेन, गंठण, बारीक मण्याची माळ, कानातील झुबे फुले असे 2 लाख 50 हजार किमतीचे सोन्याचे दागिने दोघी बहिणींचे मिळून 61 तोळे 6 ग्रॅम 659 मिलिग्रॅम वजनाचे 14 लाख 36 हजार 189 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ व त्यांच्या सहकार्यांनी भेट दिली असून तपास प्रक्रिया गतिमान केली आहे.