औरंगाबाद – रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणास गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजी वाटू लागली आहे. रशियामध्ये बिस्केक व इतर प्रांतात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले सुमारे 650 विद्यार्थी सुखरूप आहेत. पण युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या दोन विद्यार्थी अडकले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाकडे काल सायंकाळपर्यंत दोन विद्यार्थ्यांच्या पालकांचे अर्ज आले होते. युक्रेनमधील दोन विद्यार्थी बुधवारी विमानतळावर भारताकडे येण्यासाठी आले होते. परंतु विमानात जागा नसल्यामुळे त्यांना येता आले नाही. त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तेथे थांबावे लागले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून समजली. भारतीय दूतावासाच्या ते संपर्कात असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच प्रशासन पालकांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले.
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी किंवा इतर कारणांनी जिल्ह्यातील कोणी असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यासाठी प्रशासनाने केंद्र सरकार स्थानिक फोन नंबरही जाहीर केले आहेत.