हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळा ऋतू म्हटल सर्वत्र दाट धुके आणि हिरवेगार वातावारण होय. या या निसर्गरम्य वातावरणात फिरायची मजा काही औरच असते. आपणही अशा निसर्गाने नटलेल्या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल खास करून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ठिकाणांना तर मग कोयनेला फिरायला येताना काही ठिकाणांना नक्कीच भेट द्या कारण या 7 ठिकाणांना आहे खास महत्व. पाहुया कोणती आहेत ती ठिकाणे….
पहाटेच्या गुलाबी थंडीत फिरायला जाण्याची मजा काही औरच असते. अशीच कोयना धरण, कोयनानगर फुलपाखरू उद्यान, ओझर्डे धबधबा, सुंदरगड, भैरवगड, रामबाण तीर्थक्षेत्र, प्रसिद्ध येराड देवस्थान, रूद्रेश्वर मंदीर, चाफळचं राम मंदिर, प्रति औदुंबर, पाटणकर वाड्यातील राम मंदिर, ग्रामदैवत लक्ष्मीदेवीचे मंदिर, नेहरु उद्यान, तारळी धरण, काठीटेक डोंगर, १४ वरगळी, वाल्मीक पठार, उलटा सडावाघापूरचा धबधबा, तारळे गावजत्रा, सडा वाघापूर-वनकुसावडे पवनचक्की प्रकल्प अशी खास ठिकाणं पाटण तालुक्यात आहेत. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
1) कोयना धरण (Koyna Dam)
पाटण तालुक्यातील हेळवाक या गावाजवळ कोयनाधरण आहे. डोंगररांगांनी निर्माण झालेल्या खोल दरीत कोयना नदी आडवून हे प्रचंड धरण बांधण्यात आले आहे. या धरणाजवळ वसलेल्या वस्ती वजा गावाला कोयनानगर असे म्हणतात. महाराष्ट्राला वरदान ठरलेले कोयना धरणाच्या हे विशाल शिवसागर जलाशयात १३ मार्च १९९९ ला लेक टॅपिगचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. या धरणावर चार टप्प्यामध्ये विद्युत निर्मिती करण्यात येते. विद्युत केंद्र पाहण्यासाठी कुंभार्ली घाट उतरुन पायथ्याच्या पोफळी या गावी जावे लागते. इथल्या विद्युत निर्मितीमुळे हे धरण म्हणजे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. जलाशयाच्या खालून चार किलोमीटरचा बोगदा तयार करुन त्यातून पाण्याचा प्रवाह नेऊन वीज निर्मिती करण्यात आली आहे. पोफळी येथे जलविद्युत केंद्र आहे.
2) कोयना अभयारण्य (Koyna Sanctuary)
सातारा जिल्हयाच्या पश्चिम भागात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना अभयारण्य येते. जंगलात हरीण, रानगवा,लांडगा,रानडुक्कर, अस्वल, वाघ हे प्राणी बुलबुल,घार रानकोंबडा, सुर्यपक्षी हे पक्षी, करवंद, जांभूळ, चिच, करंजा, पळस, साग इ. वृक्ष विपुल प्रमाणत आढळतात. विविध प्रकारच्या वनौषधी बरोबर तमालपत्र, चारोळी,दगडफूल, कढीलिब, दालचिनी इ. मसाल्याच्या पदार्थांच्या वनस्पती आढळतात. तापोळ्यापासून शिवसागर जलशयातून मेटवलीला जाता येते. या अभयारण्यात वासोटा हा भव्य किल्ला आहे. विस्तीर्ण अशा शिवसागर जलाशय पहायला मिळतो
https://www.facebook.com/100066081007301/videos/627608875820228
3) कोयनानगर फुलपाखरू उद्यान (Koynanagar Butterfly Park)
सर्वांचे लाडके “नेहरु चाचा” यांच्या स्मरणार्थ कोयनानगर येथे बांधण्यात आलेलं नेहरु उद्यान होय. कोयना धरणाच्या उजव्या बाजूकडील टेकडीवर पं. नेहरू उद्यान तयार केले आहे. १८ डिसेंबर १९९९ रोजी ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. येथे पंडित नेहरूंचे स्मारक बांधण्यात आले असून, तेथे आकर्षक विद्युत रोषणाई करून कारंजे, धबधबे तयार करण्यात आले आहेत. तसेच निरनिराळ्या वृक्षांची लागवड केली असल्याने हे उद्यान पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. कोयना माहिती केंद्राचीही निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे.
4) ओझर्डे धबधबा (Ozerde waterfall)
कोयनानगरपासून ८ किलोमीटर अंतरावर नवजा गावच्या हद्दीमध्ये ओझर्डे येथील धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण बनला आहे. कोयना परिसरात पावसाळ्यात या ठिकाणी मोठी गर्दी होते. महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर, कास पठार या गजबजलेल्या ठिकाणांपेक्षा पाटण तालुक्यातील धोका विरहित असलेला ओझर्डे धबधबा व वाल्मिक पठारावरील विविधरंगी फुलांचे थवे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
5) रामबाण तीर्थक्षेत्र (Ramban)
निसर्गसौंदर्य लाभलेल्या पाटण तालुक्यात पुण्यातीर्थ लाभलेली आहेत. ओझर्डे धबधब्यापासून केवळ अडीच ते तीन कि.मी. अंतरावर रामबाण तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी श्रीराम , सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षे वनवास भोगण्यासाठी भटकंती करत होते. त्यावेळी ते नवजा जंगलात पोहचले. चालून-चालून थकलेल्या सीतेला वाटेत तहान लागली. यावेळी सीतेने श्रीरामांकडे पाणी पिण्यासाठी हट्ट धरला. या घनदाट जंगलात कोठे पाण्याचा माग लागत नव्हता. अशावेळी श्रीरामांनी जंगलातील एका मोठ्या दगडावर बाणाचा प्रहार केला. त्यावेळी त्या दगडातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला. सीता आणि लक्ष्मणाने प्रसन्न होऊन या पाण्याने स्वतःची तहान भागवली आणि तेथे थोड्यावेळ विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरवात केली, अशी रामायण काळातील दंतकथा रामबाण तीर्थाविषयी सांगितली जाते. आजही हा रामबाण तीर्थ असणारा पवित्र दगड नवजाच्या जंगलात पर्यटकांना पहावयास मिळतो. याठिकाणी रामनवमीला गावकरी उत्सव साजरा करतात.या उंच दगडात बाणाच्या प्रहराप्रमाणे आकार असून या बाणातून सहज ग्लासने पाणी काढता येते . येथील वैशिष्ट्य म्हणजे दगडाच्या अवतीभोवती कोणताही पाण्यासाठी पाझर नाही.
6) चाफळ राममंदिर (Chaphal Ram Temple)
पाटण उंब्रज या रस्त्यावरील चाफळ हे ठिकाण. श्री समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची येथे स्थापना केली. रामदास स्वामी बारावर्षाच्या तीर्थाटनानंतर आलयानंतर तयांनी येथे मारुतीची स्थापना केली. समर्थांनी स्वहस्ते श्रीरामाचे मंदिर बांधले. जीर्ण झालेले हे मंदिर उद्योगपती अरविद मफतलाल यांनी १९७२ मध्ये नवीन बांधून दिले. समर्थ स्थापित ११ मारुतीपैकी ३ मारुती याच परिसरात आहेत. चाफळ पासून १.५ कि.मी. अंतरावर माजलगाव येथेही रामदासांनी ११ मारुतीपैकी एकाची स्थापना केली. कवी यशवंताचे जन्मगांव चाफळ. मंदीराचे सभागृह नऊ खणांचे आहे.
7) श्री क्षेत्र धारेश्वर (Dhareshwar)
सातारा’ जिल्ह्यात पाटण जवळ एक ठिकाण आहे त्याला प्रतिकाशी समजले जाते, तेथील दर्शन घेतले तर काशीला गेल्याचे पुण्य लाभते अशी वंदता आहे. त्या ठिकाणचे नाव श्री. क्षेत्र धारेश्वर असे आहे. धारेश्वर हे आता पर्यटन स्थळ म्हणून बऱ्यापैकी प्रसिद्ध होऊ लागले आहे. नवीन महाबळेश्वरचा जो सह्याद्रीचा दुर्गम पट्टा आहे त्या भागात हे ठिकाण येते. कोकणातून जात असाल तर, चिपळूण गाठायचे नंतर १६ किलोमीटर दुर्गम कुंभार्ली घाट चढून पाटण हे तालुक्याचे घाटावरील ठिकाण गाठायचे, तिथून डाव्या बाजूला १८ किलोमीटर वर सह्याद्रीच्या उंच रांगेत हे ठिकाण वसलेले आहे. पुण्याकडून येत असाल उंब्रज मार्गे पाटण आणि कोल्हापूर कडून येत असाल तर कराड मार्गे पाटण गाठायचे. पाटण ते धारेश्वर हा मार्ग अतिशय निसर्गरम्य आहे. निसर्गाच्या कुशीत शिरणे ज्याला म्हणता येईल असा हा मार्ग. सह्याद्रीला पोखरलेली गुहा लागते. साधारण १०० मीटर लांब आणि ५० मीटर रुंद. तिथे प्राचीन धारेश्वर देवस्थान वसलेले आहे. वरून बारमाही विरळ धबधबा वाहतो आणि आपण धबधब्याच्या आत असतो.