मुंबई । राज्यात वैद्यकीय प्रवेशासाठी 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली. 70:30 कोटा पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून तसंच शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे राज्य सरकार ही कोटा पद्धत रद्द करत असल्याचं अमित देशमुख म्हणाले. तसंच यापुढे ‘वन स्टेट वन मेरिट’ राहिल असंही देशमुख यांनी सांगितलं.
वैद्यकीय प्रवेशात जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना प्रादेशिक आरक्षणाच्या 70:30 कोटा पद्धतीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील प्रवेशासाठी धडपडणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असल्याची भावना सातत्याने व्यक्त केली जात होती. मराठवाड्यात ६ तर विदर्भात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. ७०-३० कोटामुळे मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसत होता. असं स्थानिक आमदारांचं म्हणणं होतं.
या कोटा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबवण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित आमदार सतिश चव्हाण यांनी हा कोटा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. त्याला आता यश आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेण्यात आला.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 कोटा पद्धतीबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यानंतर आज अमित देशमुख यांनी विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात 70:30 ही कोटा पद्धत रद्द करत असल्याची घोषणा केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.