औरंगाबाद | जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरीच्या घटनांत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या चिंतेत भर पडली असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यासह विविध शहरातील दुचाकींची चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या चोरट्यांकडून तब्बल २ लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या ८ मोटारसायकली गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत.
औरंगाबाद ग्रामीण व शहर पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने जालना, बुलढाणा, नाशिक व जळगाव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. धुमाकूळ घालणा-या टोळीतील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहेत.
या आरोपींचा शोध घेत असताना औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याच्या अभिलेखावरील पोलीस ठाणे सिल्लोड येथून चोरून आणलेल्या बनावट नंबरच्या दुचाकी होत्या. तसेच इतर ठिकाणच्या मोटारसायकली खेड्यापाड्यातील लोकांना बॅंकेने गाड्या ओढून आणल्याची खोटी माहिती देत. गाड्या विक्री केल्याची या टोळीने कबुली दिली आहे. या सर्व आरोपींना सिल्लोड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, पो.काॅ. बाळू पाथरीकर आदींच्या पथकाने केली आहे.