सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खटाव- माण तालुक्यातील 8 युवकांची मर्चंट नेव्हीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पिता पुत्रांनी फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात रामदास खाशाबा जाधव व ओंकार रामदास जाधव (रा. धकटवाडी, ता. खटाव) या बापलेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र विष्णू देशमुख (रा. सिध्देश्वर कुरोली, ता. खटाव) यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत फिर्यादी रामचंद्र देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे की, रामदास जाधव यांच्याशी जून 2021 मध्ये येथील स्टेट बँकेत एका कामानिमित्त ओळख झाली. त्यावेळी माझा मुलगा ओंकार हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असून त्याची मोठ्या साहेबांशी ओळख आहे. तुमच्या मुलाचे काम करायचे आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी माझा मुलगा अनिकेत देशमुख (वय- 22) यालाही नोकरीची आवश्यकता असल्याचे सांगितले. जाधव याने आपल्या ओळखीचे सागर बाळासाहेब खाडे यांचेही मर्चंट नेव्हीत काम करण्यासाठी पैसे घेतले होते. त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यावर अनिकेत याच्या शिक्षणाची कागदपत्रे ओंकार जाधव याच्या मोबाईल क्रमांकावर पाठवली असता. तुमच्या मुलाचे काम होईल, त्यासाठी वरच्या साहेबांना मॅनेज करण्यासाठी अगोदर 50 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार आपण घरातील काही रक्कम व नातेवाईकांकडून काही रक्कमेची जुळवाजुळव करून 35 हजार रुपये जमवून ते जाधव यांना दिले. त्यावेळी जाधव यांनी सदरची रक्कम घेऊन उर्वरीत 15 हजार रूपये पुढील आठवड्यात द्या, असे सांगितले. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये ओंकार जाधव याने तुमच्या मुलाचे काम झाले आहे. त्यासाठी तुम्ही पहिल्या रक्कमेतील उर्वरीत 15 हजार रूपये व जादा 50 हजार रूपये असे एकूण 65 हजार रूपये आजच पाठविल्यास तुमची ऑर्डर निघेल असे सांगितले. त्यावर अनिकेत याने ओंकार जाधव याच्या बँक खात्यावर 65 हजार रूपये पाठविले. त्यानंतर पंधरा दिवसांनी ऑर्डर निघेल असे ओंकार जाधव याने सांगितले. संबंधित नोकरीची ऑर्डर पंधरा दिवसांनीही न निघाल्याने आपण ओंकार यास फोन केल्यानंतर सद्या कोवीड काळाचे निर्बंध असल्याने कामावरती हजर होता येणार नाही. मला वरून समजल्यावर बोलावून घेतो असे सांगितले. त्यानंतर पुन्हा ओंकार यास कामाबद्दल फोन करून विचारणा केली असता, त्याच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळू लागली. तसेच फोन घेण्याचे टाळण्यात येऊ लागले. रामदास जाधव यांना धकटवाडी येथे भेटून नोकरीबाबत विचारले असता तुमचे काम झाले नाही, तर पैसे परत देतो असे सांगून टाळण्यात आले.
दरम्यानच्या काळात जाधव हे त्यांचे गाव सोडून कोडोली (सातारा) येथे कामानिमित्त वास्तव्यास होते. त्याठिकाणी त्यांना भेटण्यासाठी व पैसे मागण्यासाठी गेलो असता. त्याठिकाणी आपल्याकडून एकूण 1 लाख रूपये तसेच अशोक निवृत्ती निंबाळकर (रा. सिध्देश्वर कुरोली) यांचेकडून 1 लाख रूपये, सागर खाडे (रा. एनकूळ) यांच्याकडून 35 हजार रूपये, समीर प्रकाश शिंदे (रा. वडूज) यांच्याकडून 62 हजार 400 रूपये, ऋषीकेश जाधव (रा. निसळगेंद, वडूज) यांच्याकडून 63 हजार रूपये, प्रदिप भानुदास गुजर (रा. खातगुण) यांच्याकडून 40 हजार रूपये, वैभव बळवंत देवकर (रा. राणंद, ता.माण) यांच्याकडून 25 हजार रूपये घेतल्याचे समजले. मर्चंट नेव्हीत नोकरीस लावतो म्हणून ओंकार जाधव व रामदास जाधव यांनी आपल्यासह एकूण आठ युवकांची 5 लाख 12 हजारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख करीत आहेत.