सांगली प्रतिनिधी । गेल्या काही महिन्यांमध्ये इस्लामपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नाकाबंदी सुरू केली आहे. पेठ नाका येथे शिराळ्याकडे जाणार्या मार्गावर एका तरुणा जवळ पोलिसांनी 8 हजार रुपये किमतीच्या तब्बल 9 धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सौरभ ज्ञानदेव कापसे या तरुणास अटक केली असून त्याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तलवारी ऑनलाईन खरेदी करून तो विक्रीसाठी आला असता सदरची कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक इस्लामपुर विभागात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे यांना माहिती मिळाली की, एक इसम पेठनाका येथे शिराळाकडे जाणार्या रोडवरील रिक्षा स्टॉपजवळ बॉक्समध्ये हत्यारे घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्यांनी रिक्षा स्टॉपजवळ छापा टाकून साहाय्यक पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी सौरभ कापसे यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ असलेल्या खाकी बॉक्समध्ये 6 तलवारी व दुसर्या खाकी बॉक्समध्ये 3 तलवार अशा एकून 8 हजार रुपये किमतीच्या 9 तलवारी आढळल्या.
त्याबाबत त्याच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याने सांगितले कि सदरच्या तलवारी या ऑनलाईन खरेदी करून त्या विक्री करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तसेच कापसे हा महाविद्यालयीन तरुण असून त्याला तो नेमकं काय करत आहे याचे गांभीर्य नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. त्याच्याकडून हस्तगत केलेला मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरोधात इस्लामपुर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.