कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
ताईगडेवाडी- तळमावले (ता. पाटण) ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी थेट जनतेतून सरपंच पदासाठी कै. बाजीराव यादव यांचे सुपुत्र सुरज बाजीराव यादव यांनी 554 मते मिळवत बाजी मारली. तळमावले ग्रामविकास पॅनेलच्या सौ. सोनाली जाधव, सौ. सीमा यादव व श्री. सुहास गुजर हे सदस्य पदी विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
या वेळी तळमावले ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढत ग्रामस्थांचे व व्यापाऱ्यांचे आभार मानले या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते. सव्वीस वर्षीय सुरज यादव हे उच्चशिक्षित असून कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहेत. त्यामूळे ताईगडेवाडी ग्रामपंचायतीत युवा सरपंचाची एन्ट्री झाली आहे.
ताईगडेवाडी- तळमावले हे ढेबेवाडी विभागातील अनेक गावांचे मध्यवर्ती केंद्र आहे. मोठी बाजारपेठ आहे. शैक्षणिक व व्यापारी केंद्र आहे. या गावच्या सर्वांगीण विकासासाठी एका युवा सरपंचाची जनतेने निवड केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्यातील युवा सरपंच होण्याचा बहुमान मिळाल्याबदद्दल सूरज बाजीराव यादव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.