सातारा | सातारा- कोरेगाव रस्त्याकडेला ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) गावाच्या हद्दीतील घोल नावाच्या शिवारात उसाच्या फडात उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून तीन वर्षांचा मुलगा ठार झाला आहे. या घटनेमुळे ल्हासुर्णेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ल्हासुर्णे गावच्या हद्दीत लक्ष्मण दशरथ संकपाळ यांच्या शेतातील तोडलेला ऊस सागर शिवाजी राठोड (रा. अल्हनवाडी, ता. पाथर्डी, जि. नगर) हा ट्रॅक्टरमध्ये (एमएच- 23 बीसी- 5623) भरून रस्त्याकडे निघाला होता. त्या वेळी ट्रॅक्टरच्या डाव्या चाकाखाली अचानक संकेत कृष्णा जाधव (वय- 3) हा मुलगा आल्याने तो चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्या तोंडातून रक्ताच्या उलट्या येऊ लागले. त्यामुळे त्याला तातडीने तेथील लोकांनी एका ऊसतोडणी मजुराच्या मोटारसायकलवरून कोरेगाव येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेले.
तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तो लहान मुलगा मृत्युमुखी पडल्याचे जाहीर केले. दरम्यान, याबाबतची फिर्याद मृत संकेतचे वडील कृष्णा बबन जाधव (वय- 23, रा. बोदेगाव, ता. शेवगाव, जि. नगर) यांनी येथील पोलिसात दाखल केली असून, त्यानुसार पोलिसांनी ट्रॅक्टर चालक श्री. राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.