हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतात खेळत असताना एका शेततळ्यात नऊ वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील वलशी स्टेशन येथील शिवारात घडली. या घटनेमुळे पळशी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पृथ्वीराज होणाजी हातागळे (मूळगाव-काडीवडगाव ता. वडवणी जि. बीड, हल्ली रा. पळशी ता. कोरेगाव) असे बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगावच्या तत्कालीन तहसीलदार स्मिता पवार यांचे पती प्रदीप बाबूराव पवार (रा. सागांव ता. वाळवा जि. सांगली) यांनी कोरेगाव तालुक्यातील पळशी स्टेशन येथे वाघजाई नावाच्या शिवारात 10 एकर शेतजमीन खरेदी केली आहे.
सदर क्षेत्रात सुमारे 30 गुंठ्यात शेततळे असून त्यात भरपूर पाणी असते. शेततळ्यातील पाण्याचा वापर प्रदीप पवार यांच्याकडून शेतीसाठी केला जातो. शेतीच्या देखभालीसाठी पवार यांनी बीडमधील एक जोडपे कामावर ठेवले होते. या ठिकाणी द्रौपदी होणाजी हातागळे ( वय 32) व त्यांच्या मुली कु. प्रतिक्षा, कु. दीक्षा, कु. साक्षी, कु. प्रती व मुलगा पृथ्वीराज होणाजी हातागळे (मूळगाव-काडीवडगाव ता. वडवणी जि. बीड, हल्ली रा. पळशी ता. कोरेगाव) हे शेतातील खोलीवर राहण्यास होते.
यावेळी खेळताना नऊ वर्षाच्या बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती ,मिळताच निखील सुरेश गायकवाड (रा. शिंदेवस्ती, बर्गेवाडी पो. खेड, ता. कोरेगाव) यांनी सातारारोड पोलीस दूरक्षेत्रात दिली. घटना घडलेली जमीन अमोल हणमंत गायकवाड रा. शिंदेवस्ती (बर्गेवाडी) हा खंडाने करत असल्याने निखील गायकवाड हे त्याला शेतीसाठी मदत करीत होते.
चुलत भाऊ अमोल गायकवाड याने सोमवारी सकाळी फोनवरून प्रदीप पवार यांच्या शेततळ्यात 9वर्षाच्या पृथ्वीराजचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच सातारारोड पोलीस दूरक्षेत्रात देताच पोलिसांनी घडनास्थळी भेट देऊन पृथ्वीराजचा मृतदेह शेतळ्यातून बाहेर काढला तसेच पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कोरेगावला पाठवला. याप्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून पोलीस दफ्तरी नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विशाल कदम हे करत आहेत.