औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशन डोस काल सकाळी अस्तिक कुमार पांडेय यांच्यासह मनपाच्या 60 कर्मचाऱ्यांना देण्यात आला. आज ही विशेष बाब म्हणून मनपा मुख्यालयात डोस देण्यात येणार आहे. मनपातर्फे 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. ज्यांचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशाच लाभार्थींना हा डोस देण्यात येत आहे.
यावेळी प्रशासक पांडे म्हणाले की शहरात 90 टक्के लसीकरण झाले असून, दुसरा डोस 50 टक्क्यांवर नागरिकांनी घेतला आहे. लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी महापालिकेतर्फे वॉर्डवॉर्डात शिबिरे आयोजित केली असून, नागरिकांच्या देखील प्रतिसाद मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन मनपा आरोग्य कर्मचारी डोस देत आहेत.
दिवसभरात 640 जणांनी घेतला बुस्टर डोस –
केंद्र शासनाच्या आदेशानुसार 10 जानेवारीपासून शहरात प्रिकॉशन डोसला सुरुवात करण्यात आली. काल दुसऱ्या दिवशी 640 नागरिकांनी हा डोस घेतला. यामध्ये फ्रन्टलाइन वर्कर, हेल्पलाइन वर्कर, साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नागरिक, विविध आजार असलेले नागरिक प्रिकॉशन डोस घेऊ शकतात. दुसरा डोस घेतल्यानंतर किमान नऊ महिने अंतर असणे आवश्यक आहे.