सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मलवडी (ता. माण) येथे सोने- चांदी व्यावसायिकाला तलवार व बंदुकीचा धाक दाखवत 40 तोळे सोने, चांदी व रोख 7 लाख रुपये लुटल्याची घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी व्यावसायिकासह त्याच्या पुतण्यावर तलवारीने वार केले. मात्र, त्यालाच दोघांनी पकडून ठेवले. या संशयितास सोडवण्यासाठी लुटारूंनी गोळीबारही केला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलवडी-बुध रस्त्याकडेला आर. एल. कॉम्प्लेक्समध्ये श्रीकांत तुकाराम कदम यांचे जय भवानी ज्वेलर्स हे सोने-चांदीचे दुकान आहे. श्रीकांत कदम हे आपल्या पुतण्या श्रीजित कदम सोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. या दरम्यान रस्त्यावर काही जणांनी पुतण्या श्रीजितला जोरात दणका दिला. त्यामुळे श्रीकांत यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली पडली. यावेळी सोने- चांदीच्या तीन पिशव्या काहींनी उचलल्या पळाले. दरोडेखोरांपैकी एकाने तलवारीने श्रीजितवर हल्ला केला. तर श्रीकांत यांच्या खांद्यावर वार केला. अशा अवस्थेतही या दोघा चुलत्या-पुतण्यांनी एका संशयिताला पकडून ठेवून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली.
दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चारपैकी एकजण साथीदार परत आलेला नाही, हे लक्षात येताच पळून निघालेल्यापैकी काहींनी बंदुकीतून तीन-चार वेळा गोळ्या झाडल्याचाही प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी ग्रामस्थ जमा होऊ लागल्याने तीन चोरटे पळून गेले. तर एकाला पकडण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती दहिवडी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. पसार झालेल्या दरोडेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक गणेश केंद्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली.