हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अमरावती राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी भिडेंविरोधात निदर्शने करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर अखेर संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी बोलताना त्यांनी, महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील असल्याचे म्हणले होते.
यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. तसेच भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत, संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. विधानसभेत बोलताना,”संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंनी कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. आता त्यांच्या या वक्तव्याची त्वरित दखल घेण्यात यावी.” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील घेण्यात आली होती. दरम्यान, आता या वादग्रस्त वक्तव्यामुळे संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये भिडेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण जास्त चिगळल्यास संभाजी भिडे यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे.