औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्यावर महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पीडितेच्या जबाबावरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग धरुन आमदार रमेश बोरनारे आणि इतरांनी महिलेस शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. मारहाण झालेली महिला बोरनारे यांच्या चुलत भावजयी आहेत. राजकीय दबावामुळे विनयभंगाचे कलम लावले जात नसल्याचा आरोप पोलिसांवर होत होता.
शेवटी पुरवणी जबाबानंतर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामुळे आमदार रमेश बोरनारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मारहाणीच्या घटनेनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही वैजापूर येथे येऊन पीडित महिलेची भेट घेतली होती. त्यांनी बोरनारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.