औरंगाबाद | कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानातील महागडे रेडिमेड कपडे व इतर साहित्य लंपास केल्याची घटना आज सकाळी पैठणगेट भागात समोर आली आहे. नेमके किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला हे मात्र दुपार पर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.
शेख जावेद अब्दुल राफे वय- 40 वर्षे (रा. औरंगाबाद) यांची पैठणगेट भागात एम.आर. कलेक्शन नावाने रेडिमेड कपड्याची दुकान आहे. नित्य प्रमाणे बुधवारी रात्री त्यांनी कपड्याची दुकान बंद करून घरी गेले होते. आज सकाळी शेजारील दुकानदार जेंव्हा दुकान उघडण्यासाठी आले तेंव्हा शेख यांच्या दुकानाचा शटर उचकटलेले दिसले. शेजाऱ्यांनी माहिती देताच शेख यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील महागड्या जीन्स पॅन्ट आणि शर्ट व इतर साहित्य चोरीला गेले असल्याचे समोर आले.
घटनेची माहिती प्राप्त होताच क्रांतिचौक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासला मात्र त्यामध्ये चार तासापूर्वी पेक्षा अधिकचा फुटेज दिसत नसल्याने मेमरी कार्ड काढून ते फुटेज संगणकावर तपासण्यात येत आहे. दुकानदारांची फिर्याद प्राप्त न झाल्याने नेमके किती रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. ते दुपार पर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.