टीम, HELLO महाराष्ट्र। मोठ्या थाटामाटात लग्न झाले, संसाराला सुरवातही झाली. सगळं काही सुरळीत होत. परंतु वैवाहिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या शरीर सुखापासून विवाहितेला वंचितच ठेवण्यात आले. लग्नाला नऊ महिने होऊन देखील पतीने शारीरिक संबंध न ठेवल्याने अखेर पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. शाररिक सुखापासून वंचित ठेवणाऱ्या पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना घोडेगाव जवळील सुपेधर येथे घडली असून, 27 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात पती विरोधात फिर्याद दाखल केली आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुपेधर, घोडेगाव येथील 33 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारी 2019 रोजी फिर्यादी तरुणीचा विवाह झाला. त्यानंतर डिसेंबर 2019 पर्यंत पतीने आपल्याला शरीरसंबंधापासून वंचित ठेवले. लग्नाच्यावेळी फिर्यादी तरुणीला खोटे बोलून विविध आश्वासने दिली होती. ती पूर्ण न करता फसवणूक केली. लग्नासाठी फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी 20 लाख रुपये खर्च केला असूनही त्यांच्याकडून आणखी दहा लाख रुपये आणावेत, यासाठी वेळोवेळी शिवीगाळ आणि मारहाण करीत शाररीक व मानसिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक उबाळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.