मुंबई । राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून घशाला कोरड पडलेल्या तहानलेल्या या तळीरामांनी आज सकाळी सकाळीच वाईन शॉपची दुकाने गाठली. वाईन खरेदीसाठी सर्वात आधी आपला नंबर लागावा म्हणून अनेकांनी थेट दुचाकीवरून वाईनशॉप गाठले. त्यामुळे ठिकठिकाणी वाईन शॉपबाहेर तुफान गर्दी होऊन वाहतुकीची कोंडीही झाल्याने पोलिसांना दंडुक्याच्या प्रसादाचे वाटप सुद्धा करावं लागत आहे.
राज्यात रेड झोनमधील कंटेन्मेंट परिसर वगळता इतर ठिकाणी दारू विक्रीस परवानगी देण्यात आल्याने आज मुंबई, पुणे ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून लोकांना उभं राहण्यासाठी दुकानाबाहेर ठरावीक अंतरावर गोल रिंगण करण्यात आलं होतं. या रिंगणात उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या. काही ठिकाणी तर पोलिसांना बळाचा वापर करत नियमांची अंमलबजावणी करावी लागत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”