झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृत बिबट्या

औरंगाबाद – झाडांवर फांद्यांमध्ये लटकलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळल्याचा प्रकार आज सकाळी कन्नड तालुक्यातील आमदाबाद शिवारात समोर आला आहे. शिकार करताना फांदी मध्ये अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळी काही शेतकरी शेतात जात असताना झाडावर लटकलेल्या अवस्थेत बिबट्या शेतकऱ्यांना दिसून आला. ही बाब गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावातील काही नागरिकांनी ही माहिती वन विभागाला कळविली. गेल्या चार दिवसांपूर्वीच एका विहिरीत बिबट्या आढळून आला होता.त्या नंतर पुन्हा आज मृत बिबट्या आढळल्याने आजूबाजूच्या गावात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशा प्रकारच्या घटना या परिसरात नेहमी घडत असल्याने यावर वन विभागाने तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

You might also like