हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरेगाव तालुक्यात शेतशिवारात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. अशा प्राण्यांना मारण्यासाठी काही व्यक्तीकडून शेतात जिलेटीन पुरले जात आहेत. कोरेगाव तालुक्यातील देऊर गावात रानडुक्करांच्या शिकारीसाठी शेतात पुरून ठेवलेल्या जिलेटीनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एक शेतकरी जखमी झाला असून त्याच्या पायाच्या पंज्याच्या चिंध्या उडाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील एका शिवारात रानडुकरे मारण्यासाठी काही लोकांनी जिलेटीन पुरून ठेवली होती. देऊर येथील शेतकरी भरत रामचंद्र कदम हे शेतात गेले होते. यावेळी उन्हामुळे एका झाडाखाली ते उभे असताना त्या झाडाखाली पुरून ठेवलेली जिलेटीन त्यांना दिसले नाही. त्यावरच त्याचा पाय पडल्याने याचा स्फोट होऊन आवाज झाला. यामध्ये त्याच्या पायाच्या पंज्याच्या चिंध्या उडाल्या.
यावेळी भरत कदम जोरात ओरडल्याने व जिलेटीन स्फोटाचा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करत असलेले मनोज कदम या ठिकाणी पळत आले. जखमी श्री. कदम यांना तात्काळ सातारा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. शिकारीसाठी अशा प्रकारची आघोरे उपाय करणाऱ्या लोकांचा पोलिसांनी तसेच वनविभागाने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी देऊर येथील शेतकरी करीत आहेत. या जिलेटीनमुळे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.