हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे. अशात जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बॅँका, पतसंस्था तसेच सोसायटी, खासगी सावकार यांच्याकडून कर्ज घेतली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने पीक जोमाने येईल कि नाही अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. अशात कर्ज वसुलीसाठी सोसायटी, सावकाराकडून तगादा लावला जात असल्याने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दुधनवाडी येथील धन्यकुमार जाधव या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. मला कुटूंबासह आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी या शेतकऱ्याने पत्राद्वारे केली असून त्याने ते पत्र सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री कक्षात दिले आहे.
दुधनवाडी (ता. कोरेगाव) येथील धन्यकुमार जाधव हे शेतकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहलेल्या पत्रात अनेक मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्याने म्हंटले आहे की, बनवडी सोसायटी सचिव, काही सावकार माझ्यामागे सतत वसुलीचा तगादा लावत आहेत. आम्हाला कोणत्याही सरकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने आमच्या संपूर्ण कुटुंबास आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी. गरीब शेतकऱ्यांच्या जमीनीवर धनदांडगे,सावकारांचा डोळा असतो.त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना वसुलीच्या,जप्तीच्या नोटीसा पाठवून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम केले जात आहे
माझी अल्प मुरमाड डोंगरी भागात शेती आहे.त्यातून चांगले उत्पन्न मिळत नाही गायीम्हैशी पाळून रात्रदिवस राबतो. दुधाला दर नाही, ऊसाला भाव नाही. येणाऱ्या पैशातून सोसायटी भागत नाही. बँक भागत नाही. पतसंस्थेचे कर्ज फिटत नाही. कुटुंबाकरता एक रुपया शिल्लक राहात नाहीत. त्याता शासनाने वन्यप्राणी संरक्षण कायदा केलेला आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढलेला आहे. शेतीचे नुकसान करत असून त्याची भरपाई मिळत नाही. शासन आमदार, खासदार, सर्व शासकीय नोकरदार यांचे पगार वाढवत राहते. त्यांना भत्ते, सुविधा मिळतात.
अलिशान सदनिका मिळतात. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणती सुविधा नाही. आहे त्या सुविधा फक्त कागदावरच, शासन आपल्या दारी, योजनाची जत्रा शासनाने राबवलेली आहे त्याबद्दल शासनाचे धन्यवाद. पण, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत योजना येत नाहीत. मला शासनाच्या कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. मी शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. कोरेगाव तालुक्यातील बनवडी सोसायटी सचिव वसुलीसाठी खूप तगादा लावून त्रास देत आहेत. काही सावकार वसुलीचा तगादा लावत आहेत. मला व माझ्या कुटुंबीयांना आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.