हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी हजारो तरुण-तरुणी IAS परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. काहीही झाले तरी अभ्यास करून यंदाच्यावर्षी आपण परीक्षेत यश मिळवायचेच अशी जिद्द करतात. आपल्या स्वप्नांना पूर्ण करणे हेच या विद्यार्थ्यांचे एकमेव लक्ष असते. अनेक विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितीतून परीक्षा देत उत्तीर्ण होऊन अधिकारी होतात. अशीच यशोगाथा आहे एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याच्या लेकीची. तिने वेळप्रसंगी घरातील जनावरे डोंगरावर चारून अभ्यास केला आणि मेहनीतीच्या जोरावर आज एका जिल्ह्याची जिल्हाधिकारी बनली आहे. पाहू या तिची यशोगाथा…
घरच्या परिस्थितीच जाणीव
केरळच्या इरोड जिल्ह्यातील एका अत्यंत गरीब घरातील सी.वनमती या मुलीने युपीएससीची परीक्षा पास होऊन आपले स्वप्न पूर्ण केले आहे. वनमतीच्या घरची परिस्थिती सुरवातीपासूनच अत्यंत गरीब होती. अगदी लहानपणापासूनच शाळेत जाण्याच्या वयात, अभ्यासाबरोबरच त्यांना घरातील कामात अर्थात पशुपालनात हातभार लावावा लागला. वनमती स्वतः लहानपणी म्हैस चरायला घेऊन जात असे. घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने वनमतीने परिस्थिती बदलण्याचे लक्ष्य आपल्या उराला बाळगले होते. ती म्हशींना चरायला घेऊन जाताना सोबत पुस्तकं नेत असायची आणि अभ्यास करत असायची.
मालिकेतून मिळाली अधिकारी बनण्याची प्रेरणा
बारावीची परीक्षा झाल्यावर वनमती हिच्यावर घरच्यांनी लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. या दरम्यान वनमतीने एकदा गंगा यमुना सरस्वती नावाची एक मालिका पाहिली. ज्यात नायिका एक आयएएस अधिकारी आहे. त्यानंतरच वनमतीने ठरवले होते की तिलाही आयएएस अधिकारी व्हायचे आहे.
नोकरीबरोबर अभ्यासही केला
आयएएसची तयारी सुरू करण्यापूर्वी तिने आपला अभ्यास पूर्ण केला होता. तिने संगणक अनुप्रयोगात उच्चपदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर घरगुती खर्चात मदत करण्यासाठी एका खाजगी बँकेत नोकरीही मिळवली. यानंतर तिने घरात मदत करण्यास सुरुवात केली, पण ती आपले ध्येय विसरली नाही, म्हणून तिने यूपीएससीची तयारी सुरू केली.
पहिल्यांदा अपयश मात्र, दुसऱ्यांदा मारली बाजी
युपीएसी परीक्षेची तयारी करताना प्रथमच ती नापास झाली, शेवटी वनमती ने २०१५ मध्ये दुसऱ्यांदा परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. परीक्षेला जाण्याआधी वनमती चे वडील आजारी पडले होते, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. वनमतीने वडिलांची काळजी घेताना रुग्णालयातून मुलाखत दिली होती.