हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सातारा जिल्ह्यात गावोगावच्या ग्रामदैवतेंच्या यात्रा सुरु आहेत. यात्रेंमध्ये तमाशासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन केलेले जात असून या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून मारामारीही होत आहे. अशीच एक घटना कोरेगाव तालुक्यातील हासेवाडीत घडली. येथील श्री वाघेश्वरी देवीच्या यात्रेदरम्यान महिलांसाठी आयोजित केलेल्या तमाशाच्या कार्यक्रमाचा नारळ फोडण्यावरून शनिवारी रात्री दोन गटात चांगलाच राडा झाला. यामध्ये यात्रा कमिटी सदस्य महेश सदाशिव घोरपडे व त्यांचा मुलगा रोहन घोरपडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी परस्पर विरोधी 14 जणांवर वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महेश घोरपडे यांच्या तक्रारीवरून चंद्रकांत गुलाबराव घोरपडे, सुधाकर गुलाबराव घोरपडे, भानुदास यशवंत घोरपडे, हिंदुराव आप्पासाहेब घोरपडे, विकास आप्पासाहेब घोरपडे, बबलू चंद्रकांत घोरपडे, आकाश भरत घोरपडे, सुरज शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चंद्रकांत घोरपडे यांच्या तक्रारीवरून महेश घोरपडे, रोहन घोरपडे, अतुल घोरपडे, कालिदास घोरपडे, अर्जुन घोरपडे व स्वाती घोरपडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी हासेवाडीत श्री वाघेश्वरी देवीची यात्रा होती. यात्रेनिमित्त महिलांसाठी तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तमाशा कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रीफळ हा यात्रा कमिटीने वाढवावा, असे महेश घोरपडे यांनी सुचवले होते. त्यावेळी गावातील चंद्रकांत व सुधाकर घोरपडे यांनी उपसरपंच विकास घोरपडे हे यात्रा कमिटीत असल्याने एकटेच नारळ फोडतील, असे सांगितले. यावेळी महेश घोरपडे यांनी संपूर्ण यात्रा कमिटी नारळ फोडील, असे स्पष्ट केले. यानंतर दोन्ही राजकीय गटात सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. नंतर याचे रूपांतर हाणामारी झाले.
यात्रेच्या तमाशाच्या कार्यक्रमापूर्वी मारामारी झाल्याने एकच गोंधळ उडून गेला. यानंतर याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यात्रेनंतर दोन्ही गटाने परस्पर विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.