कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कराड शहराहद्दीत वारुंजी फाटा येथे भीषण आगीमध्ये फ्रूटचे दुकान जळून खाक झाले. भीषण आगीची दुर्घटना नुकतीच घडली असून आगीमध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावरून वारूंजी फाटा येथून जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून कराडमध्ये येणारा रस्ता आहे. या मार्गावर छोटी-छोटी फळांची दुकाने आहेत. आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास येथील एका फळाच्या दुकानास अचानक आग लागली. दुकानास आग लागलयामुळे परिसरात धुरांचे मोठ्या प्रमाणात लोट पसरले. यावेळी परिसरातील इतर फळ व्रिकेत्यांमध्ये एकच गोंधळ उडून गेला. व्रिकेत्यांनी व नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
पुणे-बंगळूर महामार्गालगत कराडनजीक फ्रुटचे दुकान जळून खाक
कराड शहराजवळील वारूंजी फाटा येथील घटना : आग लागल्याने वाहतुकीची कोंडी pic.twitter.com/aKWdlt4az3
— santosh gurav (@santosh29590931) March 15, 2023
मात्र, आग वाढू लागल्याने काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस व अग्निशामक दलाच्या पथकास दिली. यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्याच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून याचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. या भीषण आगीच्या दुर्घटनेत फळ विक्रेत्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.




