‘ड्राय डे’ ला दारुचा महापूर; अकरा जणांवर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शिवजयंतीनिमित्त ड्राय डे असताना देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या अकरा जणांवर विविध भागांत कारवाई करण्यात आली. या अवैध दारू विक्रेत्यांकडून 22 हजार 410 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

ड्राय डे असताना दारूची अवैध विक्री करणाऱ्या अकरा जणांना छापा मारून पोलिसांनी पकडले. मिटमिटा भागातील एलपीजी गॅस पंपाजवळ हॉटेलचालक महेश रावसाहेब घोडके (28, रा. मारुती मंदिरामागे) हा नाश्‍ता कॉर्नर हॉटेलमधून देशी दारूची विक्री करत होता. त्याला छावणी पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक हजार दोनशे रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. सातारा गावातील शाक्यनगरात एक महिला देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून छापा मारण्यात आला. तिच्याकडून नऊशे रुपयांची दारू हस्तगत केली. रेल्वेस्टेशन रोडवरील हमसफर ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर अनीस लालमिया शेख (48, रा. हुसेननगर, बीड बायपास) हा देशी दारू विक्री करीत असताना त्याला सायंकाळी पावणेआठच्या सुमारास पकडण्यात आले. त्याच्याकडून 660 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. तसेच चिकलठाणा मिनी घाटीच्या बाजूला देशी दारू विकणाऱ्या संजय देवराव बनकर (45, रा. चिकलठाणा) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून नऊशे रुपयांची दारू एमआयडीसी सिडको पोलिसांनी जप्त केली.

किराडपुऱ्यातील पाण्याच्या बंबाजवळ विशाल गणेश इंगळे (34) हा देशी दारू बाळगत असल्याने जिन्सी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून 960 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ताहेर बिस्मिल्लाह शेख (23, रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) याला काबरानगर रस्त्यावर देशी दारू विक्री करताना जवाहरनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक हजार 50 रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. संदीप सुखदेव आहेर (42, रा. गार्डन हाउसिंग सोसायटी, बीड बायपास रोड) हा जवाहर कॉलनीतील अरिहंतनगरात विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून पाच हजार 760 रुपयांचा साठा जप्त केला. आंबेडकरनगरात सिडको पोलिसांनी छापा मारून सुधाकर पांडुरंग चव्हाण (35) त्याच्याकडून पोलिसांनी आठ हजार 640 रुपयांची दारू जप्त केली. तर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी महाराणा प्रताप चौकाजवळ शिवशंकर नारायण पवार (26, रा. बजाजनगर), विशाल बाळू सदाशिवे (19, रा. तीसगाव, खवड्या डोंगराशेजारी) आणि मनोज पृथ्वी चंद्रा (21) यांना पकडले. त्यांच्याकडून दोन हजार 340 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.