हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुलढाण्यातील शेगाव येथे आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची जाहीर सभा पार पडत आहे. लाखोंचा जनसमुदाय असलेली ही सभा शेगावच्या इतिहासातील दैदीप्यमान सभा ठरली असून या सभेला महाराष्ट्र काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, सतेज पाटील हे प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. महाविकासआघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, एकनाथ खडसे यांनी यावेळी राहुल यांचे स्वागत केले.
रोज 25 किलोमीटर चालणं ही सोपी गोष्ट नाही. ऊन, वारा, थंडी, धुकं या कशाचीच पर्वा न करता राहुल गांधी जिद्दीने चालतायत. हा देश, इथली लोकशाही वाचवण्याकरता आणि इथल्या लोकांमध्ये प्रेमाचा विचार पेरण्याकरता राहुल चालतायत. महाराष्ट्राच्या भूमीत संत आणि समाजसुधारकांचा विचार समजून घेत इथल्या सामान्य लोकांशी मोकळेपणाने बोलण्याचं काम या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलं आहे. देशाच्या भविष्यकाळाचा विचार करत असताना राहुल गांधींच्या विचारांवर विश्वास ठेवण्याचं काम महाराष्ट्रासह देशातील अनेक लोकांनी केलं. जे विरोधक होते तेसुद्धा आता मित्र झाले असून लोकशाही टिकवण्याचं काम आपली सर्वांना राहुलजींच्या सोबत राहून करावं लागेल असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.
देश तुटू नये यासाठी लोकांचा समुदाय सोबत घेऊन राहुलजी चालले असून त्यांच्या या प्रयत्नांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात मला सहभागी होता आलं नाही तरी आज राहुल यांच्यासोबत चालताना ते क्षण मी अनुभवू शकलो. हा देश तुटलाय कुठे असं विचारणाऱ्यांना मला एकच सांगावसं वाटतं की देश तुटण्याची वाट पाहत देशामध्ये द्वेष पसरवण्याचा काही लोक करत असलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठीच भारत जोडो यात्रा काम करत असल्याचं प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलं.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/5559882567398983
सामान्य जनता, विचारवंत, लेखक, न्यायाधीश या लढ्यात राहुल गांधी यांच्यासोबत आहे. जनतेचा रेटा ही प्रतिगामी विचारांची टिंगलटवाळी सहन करणार नाही हा संदेश या यात्रेत सहभागी लोकांनी दिला असून त्याचच प्रतिबिंब या यात्रेत दिसत असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
शेगावच्या इतिहासात अशा प्रकारची सभा यापूर्वी कधीच झाली नव्हती. कन्याकुमारीपासून सुरू झालेला तिरंग्याच्या रक्षणाचा प्रवास राहुल गांधी जेव्हा श्रीनगरमध्ये पोहचतील तेव्हा पूर्ण होईल. आणि त्याच वेळी देशाला कमजोर करणाऱ्या शक्तींचा अस्त सुरू होईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी व्यक्त केला.