सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील १५ ते २५ वयोगटातील युवकांच्यासाठी “उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वाई उपविभागातील १५ ते २५ मुलांच्या करिता उंच भरारी उपक्रमाच्या पहिल्या टप्यातील कार्यक्रम पंचायत समिती हॉल वाई येथे आज उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमामध्ये वाई, भुईंज, मेढा, पाचगणी, महाबळेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे १४५ मुले व युवकांनी सहभाग घेतला.
यावेळी पहिल्या टप्प्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांना शिक्षणाचे महत्व व फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बाल गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याकरीता मार्गदर्शन करणे, १८ ते २५ वयोगटातील मुलांना अपराध करण्यापासून रोखण्याकरीता त्यांच मतपरिवर्तन करुन त्यांना ग्रामीण स्वरोजगार व कौशल्य विकास मिशन यांच्या सहकार्याने त्यांना रोजगार व व्यवसाय उपलब्ध करुन देण्याचा सकारात्मक उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी १५ ते २५ वयोगटातील मुलांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले होते.
यावेळी आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थचे संचालक प्रशांत पाटील, मानदेशी फाउंडेशनचे ओंकार गोंजारी, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे भोरचे केंद्र प्रमुख योगेश गरुड, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभागच्या शितल जानवे-खराडे, भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गर्जे, महाबळेश्वर पोलीस स्टेशन इनामदार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वाई पोलीस स्टेशनचे अधिकारी बाळासाहेब भरणे म्हणाले की, शिक्षणाचे तसेच स्वयंरोजगार व व्यवसायाचे फायदे सांगून गुन्हेगारी पासून परावृत्त करणे करीता बालकांचे व युवकांचे नुकसान होणारे आहे. युवकांना व पालकांना अशा प्रकारचे युवकांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम पहिल्यांदाच झालेला असून याचा फायदा नक्कीच होईल.
यावेळी कार्यक्रमामध्ये उपस्थित युवकांपैकी १०९ युवकांनी रोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध करुन मिळावी याकरीता फॉर्म भरलेले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी केले.